माझे गाव - आंबी दुमाला

      


मला अभिमान आहे माझ्या गावाचा... आंबी दुमाला,
                          




     संगमनेर तालुक्यातील आणि अहमदनगर व पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील असलेले हे छोटेसे गाव...संगमनेरच्या दक्षिणेस,  पुणे - नाशिक महामार्गाच्या पश्चिमेस ३ कि.मी. अंतरावर असलेले सुंदर गाव ! 

      कच – देवयानी या नद्यांच्या पवित्र संगमावर अगदी वस्तुशास्रानुसार रचना असलेले गाव. गावाच्या पूर्वेला असणारे शंभू महादेवाचे मंदिर,पश्चिमेस असणारा गव्हाळा डोंगर,दक्षिणेस ढग्या डोंगरावर असणारी भवानी माता आणि उत्तरेला असणारा कोटमारा जलाशय.सुबक आणि आकर्षक असे आंबी फाट्यापासून तर गावापर्यंत दुतर्फा असणारी सुंदर फुलझाडे..

      गावातील लोकांमध्ये विकासाची दृष्टी तर पूर्वीपासूनच.. वारसा हक्काप्रमाणेच... गावामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर जो नदीवर पूल लागतो तो पूल गावाच्या एकीचे दर्शन सांगून जातो.गावाने श्रमदान आणि लोकवर्गणीतून १९६२ साली बांधला. महाराष्ट्र राज्यात त्या काळी श्रमदान..लोकवर्गणीतून तयार केलेला हा पूल लोकांची एकता व विकासामुख दृष्टीची जाणीव नेहमीच करून देतो. या पुलाच्या उभारणीसाठी मुंबईहून त्या काळी असणारे  कलापथक शाहीर अमर शेख यांचा कार्यक्रम घेण्यात आला. तेव्हा तर लाईट नव्हती.अमर शेख यांनी सांगितले कार्यक्रम करतो पण जनरेटरची व्यवस्था करा.ग्रामस्थांनी मुंबईला ट्रक नेला आणि जनरेटर आणले. त्या कार्यक्रमातून १९५०० रु.जमले. ती मदत पुलाच्या कामाला लावली.. लोकांनी श्रमदान केले. किती मोठे एकोप्याचे दर्शन !
 त्या काळी तर गावात शिकलेली जास्त माणसे नव्हती परंतु उच्च शिक्षित माणसांपेक्षाही उच्च विचारसरणी असणारी माणसे होती. इनमिन तिसरी- चौथी झालेली माणसे पण कोणत्याही इंजिनिअरचे मार्गदर्शन न घेता..तंत्रज्ञान अवगत नसतानाही अतिशय दर्जेदार पूल बांधून गावाचे दळणवळण समस्या दूर करून पुढील पिढीसाठी एक आदर्श निर्माण केला.
साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारी हि माणसं ! यांच्याकडे एकोप्याचे गुण तर होतेच तशीच धार्मिकताही ! गावच्या मधोमध असणारे जागृत देवस्थान श्री रोकडेश्वर  महाराज या ग्रामदैवतावर अतूट असा विश्वास आणि श्रद्धा ! नवसाला पावणारा, सत्याच्या पाठीमागे सतत राहणारा, श्री रोकडेश्वर महाराजांचा व्यवहार नेहमी रोकडा..तेथे उधारी चालत नाही. म्हणूनच गावातील सर्व गावकरी मंदिरात न्यायनिवाडा करायचे. कोर्ट कचेरी या भानगडीत कधी पडत नसायचे. मंदिरात देवाच्या समोर उभे राहून खोटे बोलण्याचे धाडस कुणालाही होत नाही.ज्यांनी हे केलं त्याच प्रायश्चित्त त्यांना मिळालं. म्हणून मंदिरात नेहमी सत्यच बोलले जाते. शासनाने आता तंटामुक्ती अभियान सुरु केले..पण या गावात तर पूर्वीपासूनच कोणताही वाद गावातच मिटवला जात असे.

 आंबी दुमाला हे जहागिरीचे गाव म्हणून १३२७ एकर जमीन गावाला जहागिरी मिळाली आहे. या जमिनीचा विस्तार गव्हाळ्या डोंगर.. हा तर बैलके आणि शेळ्या मेंढ्या सांभाळणाऱ्याचा जीव कि प्राणच! येथे सागवान लाकूड मोठ्या प्रमाणवर असून घावडा, करवंद,टेंभूर्णी,अमोणी,पीठवणी, यासारखी बरीच झाडे आहेत. या जंगलाची राखण करण्यासाठी गावाने राखणदार नियुक्त केलेला आहे. त्यामध्ये गावातील तरूण मंडळींनी सीताफळ, आवळा, बांबू अशी उत्पादन देणारी झाडे लावली आहेत.आंबी दुमालापासून आंबी फाट्यापर्यंत रस्त्यावर दुतर्फा अशोक,पायकस, पाम, कण्हेर, चाफा अशी शोभेची झाडे लावली आहेत. उन्हाळ्यात टँकरने पाणी घालून त्यांचे संगोपन केले आहे.त्यासाठी लोकवर्गणीतून टँकर घेतले आहेत.

गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शाळा डिजिटल झाली आहे. या मराठी शाळेवर गावातील ग्रामस्थांचा खूपच जीव आहे.शाळेची इमारत ग्रामस्थांनी श्रमदानातून उभी केली आहे. सुसज्ज आणि आदर्श आपली शाळा म्हणून सर्व माजी विद्यार्थ्यांची नाळ या शाळेशी जोडली गेलेली आहे.  इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षणासाठी गावातच श्री रोकडेश्वर माध्यमिक विद्यालयसुद्धा वसतीगृहापासून ग्रामस्थांनी हातभार लावून शिक्षणाचा वटवृक्ष उभा केला आहे. 100% निकाल हि परंपरा या विद्यालयाने जपली आहे.या शाळांमध्ये शिकून अनेक इंजिनिअर,शिक्षक,डॉक्टर,वकील,उद्योजक,कारखानदार,खेळाडू,समाजसेव क तसेच अध्यात्मिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारी व्यक्तिमत्व निर्माण झाली आहेत.त्यांनी आपले गावपण जपले आहे.

 श्री रोकडेश्वर महाराजांचा उत्सव चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंतीला असतो. पठार भागातील फार मोठा उत्सव असतो. सात दिवस अखंड हरीनाम सप्ताह असतो. पहाटे ४ ते ६ काकड आरती, ७ ते ११ पारायण, दुपारी १ ते २ नियमाचे भजन, ४ ते ५ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ, रात्री ७ ते ९ हरिकीर्तन आणि ९ ते १० संपूर्ण गावाला तसेच सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसाद असतो. रामनवमीला सकाळी १० ते १२ वा.पर्यंत रामजन्माचे कीर्तन, हनुमान जयंतीला पहाटे 5 वा.हनुमान जन्माचे कीर्तन सुरु होते.सूर्योदयाला मारुतीरायाचा जन्म होतो आंनी नंतर शेरणी वाटप कार्यक्रम होतो. आदल्या दिवशी मांडव डहाळे, दुपारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखीची मिरवणूक शेवटी काल्याच्या कीर्तनाने सांगता होते. गावामध्ये आजपर्यंत कधीही यात्रेसाठी तमाशा झाला नाही. गावातील तरून मांडली एकत्र येऊन नाटकाची परंपरा आजतागायत चालू आहे.

   महाशिवरात्री निमित्त यापूर्वी बैल गाड्यांची भव्य शर्यत व दुसऱ्या दिवशी भव्य कुस्त्यांचा आखाडा असे. या गावातील पैलवान बबन नामदेव नरवडे यांनी मुंबई येथे कुस्तीमध्ये पाकिस्तानी मल्लाला चितपट करून शिवाजी महारांजांचा अश्वारूढ पुतळा जिंकून आणला आणि तो गावकऱ्यांनी रोकडेश्वर मंदिरासमोर स्थापन केला. पै.बबन भाऊ नरवडे .. आंबीचा बबन यांचा भव्य नागरी सत्कार ग्रामस्थांनी केला.

गावाचा नावलौकिक खऱ्या अर्थाने बैलगाडा शर्यतीमध्ये पहिल्यापासून होता.संगमनेर,जुन्नर,आंबेगाव,खेड,हवेली मावळ,शिरूर इ.ठिकाणांहून लोक बैलगाडे घेवून येत असत. 

क्रिकेट हा लोकप्रिय खेळ शहरापुरता मर्यादित न राहता एस.आर.स्पोर्ट्सने अतिशय मोठ्या प्रमाणात नावलौकिक मिळवला आहे. व्हॉलीबॉल या खेळातही माजी अनेक खेळाडू या गावात आहेत.

असे हे माझे गाव डोंगराच्या कुशीत वसलेले, समृद्ध , निसर्ग सौदर्याने नटलेले, कांदा आणि फुल शेतीचे आगार, एकोपा जपणारे, एकमेकांना नेहमीच मदत करणारे, ग्राम दैवतावर अपार श्रद्धा असणारे, धार्मिक आणि तितकेच सामाजिक विकासाची दृष्टी असणारे, शेती सुजलम..सुफलाम.. शिक्षण, उद्योजक क्षेत्रातही अग्रेसर असणारे हे माझे गाव मला खूप खूप आवडते.

                                                                                                                                                             शब्दांकन – श्री.राजू मास्तर ढेरंगे.

No comments:

Post a Comment

    ◉✿ [ लोकसहभागातून होत आहे कायापालट ]✿◉  *🏆माझे गाव..      *माझी शाळा..*     *माझा अभिमान..*                  *★आपली शाळा....*        ...