कोटमारा धरण


    

 

कोटमारा जलाशय – आंबी दुमाला 

कोटमारा जलाशय अतिशय महत्वाचा प्रकल्प आंबी दुमाला गावाच्या इतिहासात खऱ्या अर्थाने अमृतरूपी विकासाची गंगा आणण्याचे महान कार्य कै.नाथाबाबा शेळके ( बोटा ) व आंबी दुमाला गावच्या जुन्या पिढीतील महान विभूतींनी तत्कालीन पाटबंधारे मंत्री बी.जे.खताळ पाटील यांच्या सहकार्याने हा प्रकल्प कार्यान्वित झाला.संगमनेर तालुक्यातील एक नंबरचा जलसाठा या धरणात होतो. या धरणाची क्षमता ०.९७ टी.एम.सी.  इतकी आहे.
आंबी दुमाला गावच्या उत्तरेला असणारे हे धरण असंख्य प्राणी, पशु-पक्षी आणि परिसरातील काही गावाची तहान भागवण्याचे काम करते. संपूर्ण पठार भागामध्ये एक प्रकारची जलसंजीवनीच आहे. आजूबाजूच्या आणि शेजारील जमिनींची माती घेऊन संपूर्ण मातीचा भराव तयार करण्यात आला. सन-१९८२/१९८३  मध्ये जमीन संपादित करण्यात आली.बरीच वर्षे या धरणाचे काम चालू होते. कोटमारा धरण हे नाव पूर्वी या ठिकाणी एक मोठा पाण्याचा डोह असायचा. त्या डोहात बाराही महिने पाणी असायचे.म्हणून या धरणाला कोटमारा हे नाव पडले.
कच नदीवर बांधण्यात आलेला हा जलाशय दरवर्षी पावसाळ्यात ओसंडून वाहतो.प्रत्यक्षात आंबी दुमाला गावातील ढेरंगे पाईन ( पूर्वीचे नाव कुत्तर ठीके ) येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर हा प्रकल्प उभा राहीला. वै.सुकाबाबा ढेरंगे, संभाभाऊ ढेरंगे, वै.भगवंत विष्णू ढेरंगे या शेतकऱ्यांनी प्रकल्पास जमिनी अल्प मोबदल्यात शासनास दिल्या. 
 धरणावर काम पाहणारे शासकीय इंजिनिअर हे देखील आंबी दुमाला गावचे  आणि येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झालेले श्री.बाळासाहेब हरीशेठ नरवडे यांनी आपल्या गावचा प्रकल्प यशस्वी रित्या पूर्ण केला.
कोटमारा धरणातून कुरकुटवाडी, बोटा याठिकाणी पाईपलाईनने पाणी शेतकरी आपल्या शेतीला नेतात. या परिसरासाठी आणि शेतीसाठी हे धरण वरदान ठरले आहे.
आंबी दुमाला गावचा संपूर्ण शिवार त्यामध्ये नागाया – वाघाया, उंबरी, चांभारवाडी पर्यंत सर्व हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आली.
  आंबी दुमाला गावाला या जलाशयामुळे कधी दुष्काळ माहित नसतो.साकुर, मांडवे, ढवळपुरी तसेच परिसरातील मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना उन्हाळ्यात या धरणातील अमृतरूपी पाणी पाजतात.
 भोरटेक नावाचा डोंगराजवळ असलेले हे धरण व त्या धरणाजवळ असलेले दत्त मंदिर, विस्तीर्ण जलाशय, तेथून दिसणारे आंबी गावचे विहंगम दृश्य, हे सगळ म्हणजे पर्यटकांसाठी मेजवानीच ठरत आहे. परिसरातील शाळांची परिसर भेट,वनभोजन यासारखे उपक्रम यामुळे हा परिसर मुलांच्या किलबिलाटाने गजबजून जातो.दरवर्षी दत्त जयंतीला मोठा उत्सव या ठिकाणी होत असतो. गावातील सर्व ग्रामस्थ दत्त महारांजांच्या प्रगट दिनाच्या दिवशी या धरणावर येतात.
गावाला व परिसराला नवसंजीवनी देणारा, वरदान ठरलेला  हा कोटमारा जलाशय एक ऐतिहासिक ठेवाच आहे.
शब्दांकन – राजू मास्तर ढेरंगे

No comments:

Post a Comment

    ◉✿ [ लोकसहभागातून होत आहे कायापालट ]✿◉  *🏆माझे गाव..      *माझी शाळा..*     *माझा अभिमान..*                  *★आपली शाळा....*        ...